Home » » स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

Written By Nirbhaya on Monday, April 27, 2020 | April 27, 2020

 स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

  स्त्री जन्मा ही तुझी कहाणी



          आजच्या ह्या एकविसाव्या शतकात स्त्री मोठमोठ्या क्षेत्रात काम करताना आपल्याला दिसून येते. तिच्या विलोभनीय,यशस्वी कामगिरीने ती आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरताना दिसते.प्रत्येक स्त्री तिच्या मरणोस्तोवर मुलगी,आई,बहीण,काकी,आत्या,मामी,आजी इत्यादी नाती निभावते.आजची स्त्री जगाच्या कानाकोपऱ्यात आपलं नाव गाजवतेय.अंतरिक्ष कल्पना चावला,गायिका लता मंगेशकर,समाजसेविका सिंधुताई सकपाळ,भारतीय पुलिस किरण बेदी,राजकारणात इंदिरा गांधी,कुस्तीपट्टू गीता फॊगाट अश्या अनेक स्त्रियांनी देशाचं नाव उंचावलंय.  आज महिला देशाच्या रक्षणासाठी सैन्यात आपल्या प्राणांची बाजी लावताना दिसून येतायत. नाटके,सिनेमा,जाहिराती,दूरचित्रवाणी अश्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया काम करतायत.त्याच बरोबर आजची स्त्री ही क्रिकेट खेळताना,गाड्या चालवताना,स्वतःचा व्यवसाय चालू करून इतरांना रोजगाराच्या संधी उलब्ध करून देताना,शिक्षण शिकवताना,सामाजिक उपक्रम राबवताना दिसून येतात.प्रत्येक  क्षेत्रात ती आज काम करतेय पण त्याच बरोबर तिने आपल्या घराची जबाबदारी सोडलेली नाही. आपल्या संसाराकडे घराकडे तिचे तितकेच लक्ष असते .
          आज स्त्री उंच भरारी घेताना दिसते आहे, पण काही भागात स्त्रियांना अजूनही बंधनात ठेवले जाते आहे.पुरुषप्रधान संस्कृतीला अजूनही आळा बसलेला नाही.मुलगा म्हणजेच वंशाचा दिवा असे विचारअजूनही काही समाजात आहेत. मुलगी झाली तर आनंद साजरा होताना दिसत नाही.त्या मुलीला मान भेटताना दिसत नाही. एखादया स्त्रीला लग्नना नंतर मूल झाले नाही तर समाज तिला वांझोटी ह्या नावाने पुकारतो. एखादा पुरुष लग्नाशिवाय मज्जेत राहू शकतो त्याला कोणी उलटसुलट बोलताना दिसणार नाही पण हेच जर एखादया स्त्रीने केले तर तिच्यावर नाना प्रकारचे आरोप लावले जातात.जन्म झाल्यावर ती पित्याच्या छत्रछायेखाली जीवन जगते आणि लग्नांनंतर पतीच्या.पित्याने दिलेले नावही तिला लग्नानंतर बदलून तिची नवीन ओळखच तयार होते. अश्यात जर सासर समजून घेणार असेल,तिच्या कलाने वागणार असेल,तिला चुकीच्या गोष्टी समजून सांगणार असेल तर ती आनंदाने संसार करते नाहीतर तीच अख्ख आयुष्य रडत जात. पण आजची स्त्री नोकरी करत असेल,स्वावलंबी असेल  तर ती कोणत्याही संकटाचा सामना करू शकते आणि सक्षम बनते.
          आजच्या ह्या शिकल्या सवरलेल्या समाजात अजूनही हुंड्यासारख्या प्रथा चालताना दिसतात.ह्या प्रथांना कधी आळा बसणार? प्रत्येक स्त्री जन्माला आली कि तिच्यात शारीरिक बदल होत असतो मासिक पाळी जी प्रत्येक मुलीला तिच्या वाढत्या  वयोमानानुसार येते. तेव्हा ती मुलगी पुढची पिढी जन्माला देण्यास पात्र ठरते,असा नैसर्गिक नियमच आहे. पण काही ठिकाणी स्त्रीच्या ह्या शारीरिक अवस्थेत तिला त्या दिवसात कुटुंबातील माणसे वेगळी ठेवतात.देवाचा भ्रष्टकार होईल अश्या पुरातन,मागास विचारांचे लोक अजूनही समाजात आहेत,त्यामुळे त्या स्त्रीला मासिक पाळीत कोणालाही स्पर्श करता येत नाही. ह्या काळा आड गेलेल्या विचित्र परंपरा थांबवायला हव्या. समाजात एखादी मुलगी मनमोकळेपणाने वागली तर समाज म्हणतो मुलीला घरच बंधन नाही,शिक्षण घेऊन ही काय करणार नवऱ्याच्याच घरी जाणार,प्रेमात पडली तर घराचं नाव बदनाम केलं अश्या अनेक वागणुकीतून स्त्रियांना दोष दिला जातो.पण आजच्या हुशार सुशिक्षित स्त्रिया ह्या सर्वाला मागे टाकून स्वतःला निर्माण करताना दिसतात .
          पूर्वीच्या काळात तर स्त्रियांना घराच्या बाहेर पाऊल टाकायची सुद्धा मुभा नव्हती.फक्त चूल आणि मुलं इतपतच त्या सामान्य बाईची कामगिरी. ना त्या स्त्रीला  कसला मान दिला जात होता ना सन्मान.तोंडातून ब...उच्चरायचीही तिला परवानगी नसे. पित्याच्या घरी काही वर्षे झाली कि कोवळ्या वयातच तीच लग्न लावत.एका अनोळखी घरात जाऊन तिथला संसार सांभाळायचा.त्या स्त्रीच्या मनाचा विचार करून किंवा हे मान्य आहे का? हे सुद्धा तिला विचारले जात नसे.स्थळ आलं कि तिचा विवाह करून देत.त्या वेळेस आई बाप पण चिंतेत असत आपल्या मुलीला वर मिळेल का नाही? जास्त काळ मुलगी घरात राहिली कि समाज तिच्या कुटुंबाला दोष देई,आरोप करीत त्यामुळे कोण्या आईबापाला वाटले जरी मुलगी सोबत रहावी तरी ते शक्य नव्हते. सासरी आल्यावर कोवळ्या वयातच सासरच्या माणसांशी जमवून घ्यायचं.मुलगा झाला कि कौतुक,मुलगी झाली कि मानसिक,शारीरिक छळ केला जाई. लग्नांनंतर मुल झालं नाही तर नवरा दुसरे लग्न करीत असे. नवरा वाराला कि त्या स्त्रीला सती दिले जाई,तिचे केशवापण केले जाई. स्वतःच्या आईबापाच्या घरीजाण्याची परवानगीही तिला नसे. मग घाणेरडा समाज त्या स्त्रीचे शोषण करीत असे. सासरी कितीही त्रास झाला तरीही ती मुकाट्याने सगळं सहन करीत असे. ह्या सर्व वाईट,घृण अश्या समाजाच्या वागणुकीवर आळा घातला तो आपल्या समाजसुधारकांनी.
          ज्या काळात स्त्रियांना कशाचीही मुभा नव्हती,स्वतंत्र नव्हतं त्या काळात त्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुले यांनी स्त्री-शिक्षणाचा पाया रचला.ज्योतिराव सुशिक्षित होते,त्यांनी पत्नी सावित्रीबाईंना शिकवून सामाजात पहिली मुख्याध्यापिका घडवली. त्यांनी मुलींसाठी शाळा चालू केलेल्या पाहून समाजाने सावित्रीबाईंवर शेण फेकले.तरीही त्यांनी न डगमगता स्त्रियांचे शिक्षण चालू ठेवले. आज सामाज्यामध्ये प्रत्येक स्त्री शिकत आहे ती ह्या क्रांतिज्योतीमुळेच. रस्त्याच्या कडेला पडलेल्या,बेघर,गरीब लोकांना राहण्यासाठी आसरा दिला अश्या थोर समाजसेविका मदर तेरेसा. नवऱ्याने सोडल्यावरही पोटात चिमुकल्या जीवाला घेऊन दरोदारीभीक मागून आज जगाची आई बनलेल्या सिंधुताई सकपाळ. इंग्रजांशी दोन हात करत में मेरी झाँसी नहीं दूंगी अशी गर्जना करणारी महान राणी लक्ष्मीबाई.आपल्या शिवाजीमहाराजांना घडवणारी माय माता जिजाऊ. अश्या अनेक खंबीर स्त्रिया ह्या देशाला काहींना काही देऊन गेल्या.शिकायचं असेल पुढे जायचं असेल तर ह्या थोर मातांना प्रणाम करा,त्यांचे विचार जोपासा आणि खंबीर बनून लढा द्या. कोणतीही स्त्री कमकुवत नाही हे लक्षात ठेवा .
          आज देशात स्त्रियांच्या सेवेसाठी अनेक कायदे आहेत. ह्या अनेक कायद्यांची नोंद डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातं आहेच. त्याच प्रकारे स्त्रीच्या प्रत्येक सुरक्षिततेचा कायदा त्यात नमूद आहे. आज समाजात अनेक स्त्रियांवर अन्याय होताना दिसतात.बलात्काराचे प्रमाण तर अधिकच वाढताना दिसते. गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत. त्यांना शिक्षा कधी होणार ?स्त्रियांवर झालेल्या अनेक अन्यायाचे गुन्हे दाखल आहेत. फक्त स्त्री जन्मा ही  तुझी कहाणी असं बोलून चालणार नाही. त्यासाठी प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक प्रसंगात योग्य ती पाऊल उचलली पाहिजेत. अन्यायाला बळी न पडता खंबीर होऊन लढा दिला पाहिजे.स्त्रीकडे जी शक्ती आहे ती काही कमी नाही. प्रत्येक स्त्री ही देशाच्या विकासचा महत्वपूर्ण ठेवा आहे. स्त्रीच अस्तित्व म्हणजे जगाला मिळालं एक वरदानच  आहे!






                                                                                                                                -योगिनी उत्तम मोंडकर





Popular Posts

Followers